तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व वैशाख पौर्णिमा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स । बुद्धं सरणं गच्छामि | धम्मंसरणं गच्छामि । संघं सरणं गच्छामि । भगवान बुद्धांचा जन्म याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली...
तथागताच्या जीवनात पौर्णिमेची महत्व
वैशाख पौर्णिमा.
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
बुद्धं सरणं गच्छामि |
धम्मंसरणं गच्छामि ।
संघं सरणं गच्छामि ।
भगवान बुद्धांचा जन्म
याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात केले आहे. ते लिहितात, पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, "माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते." "तुझ्या इच्छे प्रमाणे होईल" राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच 'लुंबिनी वन' होय. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगांचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरालाप काढीत होते. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुंध्यापाशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळूकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यांपैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायांच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली. आणि अशाप्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्हासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूंचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले.
३५ व्या वर्षी ज्ञान प्राप्ती
याच वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हा वयाच्या ३५व्या वर्षी गया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या उरुवेला वनामध्ये पिंपळवृक्षाखाली बसला असताना बुद्ध झाला. सिद्धार्थ गौतमास वैशाख पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरी दु:खमुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांच्या मनातील अंध:कार पूर्णपणे दूर झाले व ते सम्यक संबुद्ध झाले. याच दिवशी सिद्धार्थ गौतमाला चार आर्यसत्यांची अनुभूती झाली. 'भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केले आहे. या ग्रंथात प्रकरण तीन मध्ये यावर प्रकाश टाकला आहे.
८० व्या वर्षी महापरिनिर्वाण
याच पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शाल वना मध्ये महापरिनिर्वाण झाले. या पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरी मनाच्या जागरुक अवस्थेत समाधीचा अभ्यास करताना गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले.
गौतम बुद्धाच्या जीवनात जन्म, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. निसर्गात दुर्मिळ अशाच या घटना आहेत. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेस 'त्रिगुणी पौर्णिमा' असे म्हणतात.
टिप्पण्या